
दामले फेलमध्ये शिवसेनेचा धडाका ! प्रभाग ५ च्या कॉर्नर सभेला जनसागर लोटला
▪︎संदीप खोब्रागडे-गीता पडोळे जोडीला तुफान प्रतिसाद; पायल तोडसाम यांच्या भाषणाने सभा गाजली, विरोधकांच्या गोटात खळबळ.
वणी : वणी नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ५ (दामले फेल) येथे गुरुवारी शिवसेनेची भव्य कॉर्नर सभा पार पडली. संध्याकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या सभेला प्रभागातील महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी हजेरी लावली. रस्त्यावरून वाहने थांबवून ऐकणाऱ्यांची गर्दी आणि सतत टाळ्यांचा कडकडाट यामुळे सभेचे वातावरण ऐतिहासिक झाले.
शिवसेनेचे प्रभाग ५अधिकृत उमेदवार संदीप मुरलीधर खोब्रागडे व सौ. गीता सचिन पडोळे यांनी प्रभागातील प्रलंबित रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट्स आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची थेट हाताळणी करणारी भाषणे केली.
“आम्ही फक्त निवडणूक लढत नाही, तुमचे स्वप्न पूर्ण करायला येतोय,” असे सांगत विजय चोरडीया यांनी उपस्थितांचे मन जिंकले.

नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार कु. पायल तोडसाम यांनी तर तरुणाईला थेट आवाहन करताना सांगितले, “वणीला महाराष्ट्रातील नंबर वन नगरपरिषद बनवायची असेल तर एक संधी द्या, आम्ही करून दाखवतो!” त्यांच्या आक्रमक आणि विकासाभिमुख भाषणाला उपस्थितांनी टाहो फोडत साथ दिली.
सभेला शहरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. विजय चोरडिया, विनोद मोहितकर, मनीष सुरावार, महावीर कटारिया, राहुल मुंजेकर, कुणाल चोरडिया, सुरेश रायपुरे, आशिष गुप्ता आणि प्रकाश पडोळे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग ५ मधून शिवसेनेला मिळत असलेला हा प्रचंड जनसामान्यांचा पाठिंबा पाहता विरोधी उमेदवारांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसत आहे.














