
शिवसेना : प्रभाग १० च्या कार्नर सभेला जबरदस्त उत्साह; “तोडसम-बोथरा-साठे” जोडीला प्रचंड समर्थन
▪︎यवतमाल जिल्ह्यातील वणी न.प. निवडणुकीत मतदारांचा जोरदार प्रतिसाद;
▪︎शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विजय चोरडीया यांचा नेतृत्वात शिवसेनेचा प्रचार मोहिमेला वेग.
वणी । २८ नोव्हेंबर २०२५ :

यवतमाल जिल्ह्यातील वणी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्र. १० मधील शिवसेनेचा कार्नर सभेला मतदारांकडून अपेक्षेपेक्षा जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेनेचे प्रभाग क्र.१० चे अधिकृत उमेदवार अक्षय बोथरा आणि मीनाक्षी साठे या जोडीच्या प्रचाराला स्थानिक नागरिकांनी दाद दिली, तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसम यांच्या उपस्थितीने या सभेला अधिक रंगत आली. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या या उमेदवारांना मतदारांच्या भावनिक आधाराने प्रेरणा मिळाली असून, प्रचार मोहिमेला आता नवीन उभारी मिळतेय.
या सभेत बोथरा आणि साठे यांनी स्थानिक समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत मुद्द्यांवर भर देऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधला.

पायल तोडसम यांनी नगराध्यक्ष म्हणून वणीच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना असल्याचे सांगितले. सभेला उपस्थित असलेल्या शेकडो मतदारांनी घोषणांद्वारे आपला उत्साह व्यक्त केला, ज्यामुळे प्रचाराचे वातावरण तापले.
वणी नगरपरिषदेच्या एकूण १४ प्रभागांमध्ये ही निवडणूक तीव्र होत असून, विविध पक्ष आणि स्वतंत्र उमेदवार यांच्यात चुरस आहे. प्रभाग १० सारख्या भागांतून मिळत असलेल्या समर्थनामुळे बोथरा-साठे जोडीला विजयाची आशा वाढली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रक्रियेत मतदारांची जागृती आणि सहभाग वाढत असल्याचेही सांगितले जातेय.
स्थानिक राजकीय वर्तुळात या सभेची चर्चा होत असून, येत्या काही दिवसांत इतर प्रभागांतही अशा सभा वाढण्याची शक्यता आहे. वणीकर मतदार आता बदलाच्या अपेक्षेत असून, प्रचाराच्या या लाटेत कोण बाजी मारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














