
वणी न.प. निवडणूक 2025
धडाकेबाज राजीनामा
भाजप जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया यांचा पक्षाचा व सर्व पदांचा राजीनामा; “स्थानिक नेत्यांनी बहिष्कार घातला”
वणी । दि. २४ नोव्हेंबर २०२५ :
वणी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आज खळबळजनक घटना घडली. भाजपचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष तथा शहरातील प्रभावशाली युवा नेते कुणाल चोरडिया यांनी विनायक मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचा व पक्षातील सर्व पदांचा जाहीर राजीनामा दिला. त्यांनी आपल्या लिखित राजीनाम्यासह अनेक गंभीर आरोप करीत स्थानिक भाजप नेत्यांवर थेट बोट रोखले.

“मी व माझ्या वडिलांनी भाजपसाठी जीवाचे रान केले. वडील विजय चोरडिया यांनी पक्ष सोडल्यानंतरही मी एकनिष्ठ राहिलो. मात्र स्थानिक पक्षश्रेष्ठींनी माझा सतत बहिष्कार केला. बैठका, जिल्हाध्यक्षांचा दौरा, नियोजन समित्या, उमेदवार निवड – कशातही मला विश्वासात घेतले नाही. जणू काही मला पक्षातून हाकलण्याचाच कट रचला गेला,” अशा शब्दांत कुणाल चोरडिया यांनी आपली व्यथा मांडली.
ते पुढे म्हणाले, “वरिष्ठ नेत्यांसमोर मी वारंवार वणीतील स्थानिक परिस्थिती मांडली, पण योग्य दखल घेतली गेली नाही. निवडणुकीच्या या महत्त्वाच्या काळात मला जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले गेले. अखेर अतिशय जड मनाने व दुःखाने मी व माझा मित्र पार्थ त्रिवेदी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.”
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना कुणाल चोरडिया यांनी सांगितले की, “दोन्ही शिवसेना गटांनी (शिंदे गट व ठाकरे गट) मला पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. पुढे राजकीय भूमिका कोणती घ्यायची हे अद्याप निश्चित झालेले नाही. मी लवकरच वडील विजय चोरडिया यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करणार आहे.”

विजय चोरडिया यांनी नुकताच भाजप सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला असतानाच, आता त्यांचा मुलगा कुणाल यांनीही भाजपला रामराम ठोकल्याने वणीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपला मोठा धक्का बसला असून, महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
कुणाल चोरडिया हे वणीतील तरुण मतदारांमध्ये लोकप्रिय चेहरा मानले जातात. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या प्रचाराला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेला आणखी एक मोठे बळ मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
वणीची निवडणूक आता आणखी रोमांचक झाली आहे! पुढचे काही दिवस कुणाल चोरडिया कोणत्या पक्षाच्या झेंड्याखाली उभे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

■□■












