
प्रशांत समर्थ समर्थकांत नाराजीची लाट : “कॉंग्रेसने फसवले!”
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीनंतर कॉंग्रेसकडून केलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याची तीव्र भावना प्रशांत समर्थ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता उफाळून आली आहे. भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असलेले प्रशांत समर्थ यांनी ‘घरात दोन पदे मिळावीत’ या अपेक्षेने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र प्रवेशानंतर कॉंग्रेसकडून त्यांना “वचनपूर्ती” नव्हे तर “वार्यावर सोडण्यात” आल्याचा आरोप त्यांचे समर्थक करू लागले आहेत.
मुनगंटीवारांच्या विकासाच्या तुलनेत कॉंग्रेस रिकामी?
शहरात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकामांचा झंझावात सुरू असताना, कॉंग्रेसकडे सांगण्यासारखे मुद्देच उरले नाहीत. नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही न मिळाल्याने ‘इज्जत’ वाचवण्यासाठी कॉंग्रेसने प्रशांत समर्थ यांना मोठमोठी आश्वासने आणि पैशाचे आमिष दाखवून पक्षात घेतले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु आता त्याच आश्वासनांना पाळण्यात कॉंग्रेस अपयशी ठरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे.
“जनशक्ती विरुद्ध धनशक्ती” – समर्थकांमध्ये संताप
कॉंग्रेसकडे धनाढ्य उमेदवारांची रांग असूनही, प्रशांत समर्थ व एकता समर्थ हे आर्थिक अडचणीत असल्याची कबुली कॉंग्रेस नेत्यांकडूनच दिली जाऊ लागली आहे. काही उमेदवारांनी फक्त घरटॅक्स साडेअठरा लाख रुपये भरल्याची चर्चा आहे, तर दुसरे उमेदवार कोट्यवधीची संपत्ती बाळगणारे आहेत. अशा वेळी “जनशक्ती विरुद्ध धनशक्ती” हा शब्दप्रयोग करून प्रशांत समर्थ यांच्या अडचणींची कबुली देणाऱ्या कॉंग्रेसमुळेच, त्यांना फसवले गेल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
भाजपाची विराट सभा – कॉंग्रेस गोंधळलेली?
22 नोव्हेंबर रोजी झालेल्या भाजपाच्या मेगा सभेला रामलीला भवन परिसरात तब्बल पाच हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती होती. या सभेत आमदार मुनगंटीवार यांनी विकासपर्व, भावी योजनांचा रोडमॅप जाहीर करून वातावरण भाजपामय केले. त्याउलट, कॉंग्रेसकडून 23 तारखेला फक्त 50-100 कार्यकर्त्यांसमोर जाहीरनामा प्रसिद्ध करून कार्यक्रम आटोपता केला. यावरून कॉंग्रेस प्रशांत समर्थ यांना पुरेशी ताकद देत आहे का, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित होऊ लागला आहे.
महत्त्वाचे नेतेच अनुपस्थित – समर्थक संभ्रमात
ज्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून प्रशांत समर्थ यांनी भाजपाला रामराम केला, तेच नेते निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी वैयक्तिक कार्यक्रमासाठी शहर सोडून जाणार असल्याने समर्थकांमध्ये संभ्रम आणि नाराजी अधिकच वाढली आहे. “आम्ही कोणाच्या भरोशावर ही निवडणूक लढवतो आहोत?” असा प्रश्न आता प्रशांत समर्थ यांच्या गोटात उभा राहिला आहे.
एकंदरीत, कॉंग्रेसमध्ये प्रवेशानंतर प्रशांत समर्थ हे ‘आश्वासनां’वर अडकून पडल्याची भावना त्यांच्या समर्थकांत ठसठशीतपणे दिसू लागली आहे.












