
“इतिहासही विसरू नका!” — मूल शहर भाजपा नेते मोतीलाल टहलियांनी यांचा इशारा
मूल : शिवानी आगडे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसकडून करण्यात आलेले आरोप हे केवळ राजकीय खोटारडेपणा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा तीव्र निशाणा मूल शहर भारतीय जनता पार्टीचे भाजपा नेते मोतीलाल टहलियांनी यांनी साधला. “काँग्रेसने पेरलेलं हे खोटं कथानक आहे; सत्य अगदी वेगळंच आहे,” असे टहलियांनी यांनी स्पष्टपणे सांगितले.
भाजपाने कॉंग्रेस सारखे विरोधी विचारसरणीचे उमेदवारांस उमेदवारी न देता, स्वत:चे कार्यकर्तीस उमेदवारी दिली. ती संघाचे सांगणेवरून दिली काय किंवा भाजपाने अंतर्गत निर्णय घेवून दिली काय. यावर कॉंग्रेसला दु:ख का होत आहे? त्यांचेकडे कॉंग्रेसकडून निवडूण येण्यायोग्य एकही उमेदवार का मिळाला नाही यावर त्यांनी चिंतन करावे असा टोला टहलियांनी यानी लगावला आहे.
टहलियांनी म्हणाले, “शिवानी आगडे किंवा संदीप आगडे हे भाजपाचे अधिकृत कार्यकर्तेच नव्हते. फक्त हितचिंतक म्हणून त्यांनी उमेदवारी मागितली होती. पक्षाने सर्व उमेदवारांची सखोल तपासणी करून तीन पिढ्यांपासून संघ–भाजपात काम करणाऱ्या, उच्चशिक्षित, प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. यात कोणाचाही अपमान किंवा अन्याय झालेला नाही. तीन पिढ्यापासून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यास उमेदवारी दिली नसती तर तो अन्याय झाला असता. कोण किती बलाढ्य आहे त्यापेक्षा कार्यकर्त्याचा सन्मान किती महत्त्वाचा आहे भारतीय जनता पार्टी करिता महत्त्वाचे आहे”
मुळात भाजपाने आपल्या निवडणूक रणनितीचा भाग म्हणून उमेदवारांची यादी जाहीर केलीच नव्हती, त्यामुळे आधी शिवाणी आगडे यांची उमेदवारी जाहीर झाली हे काॅंग्रेसच्या डोक्यातील खुळ आहे.
काँग्रेसवर पलटवार करत त्यांनी म्हटले की, “पक्षात नसलेल्या व्यक्तीस उमेदवारी दिली नाही म्हणून भाजपावर ओरड करणाऱ्या काँग्रेसने आधी स्वतःच्या कपाळावर येणारा आरसा पाहावा. दोन दिवसांपूर्वी पक्षप्रवेश केलेल्या भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीला थेट नगराध्यक्ष पदाची आणि त्या कार्यकर्त्यास मागील तेथील नगरसेवक पदाची उमेदवारी देऊन स्वपक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय करणारे काँग्रेसवाले आम्हाला न्याय शिकवतात? हा तर स्वतःच्या कार्यकर्त्याच्या छातीवर पाय ठेऊन दिलेला अन्याय आहे.”
इतिहासही त्यांनी दाखवून दिला:
“काँग्रेसने विसरू नये, यापूर्वी तेली समाजातील ज्येष्ठ नेते देवरावजी भांडेकर यांना काँग्रेसने आमदारकी दिली होती. तेव्हा आज स्वतःला निष्ठावंत म्हणवणाऱ्या काँग्रेस नेत्यांनीच आमच्या भाजपाच्या उमेदवाराला मदत केली होती. त्यांच्या निष्ठेचा आणि इतिहासाचा काँग्रेसने नेहमीच विश्वासघात केला आहे.”
टहलियांनी म्हणाले की, भाजप कधीही जातीय राजकारण करत नाही; उलट सर्व समाजांना समान स्थान देणारा पक्ष आहे. तेली समाजातील महेंद्र करकाडे यांना पूर्वी थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली होती, बल्लारपूरमध्येही तेली समाजातील निष्ठावंत कार्यकर्तीला उमेदवारी दिली आहे, आणि मुल नगर परिषदेतही तेली समाजातील उमेदवारांना प्राधान्य दिले आहे.
त्यांनी काँग्रेसवर आणखी आरोप करत सांगितले की, “मनिष नामदेव कावळे या तेली समाजातील युवकाला उमेदवारीचे आमिष दाखवून काँग्रेसने पक्षप्रवेश तर करून घेतला, पण ताबडतोब बाजूला सारत धनाढ्य उमेदवाराला तिकीट दिलं. त्यामुळेच काँग्रेसचे स्वतःचे कार्यकर्ते समाजमाध्यमावरून आज खुल्या नाराजीत आहेत.”
टहलियांनी यांनी जोरदार शब्दांत आरोप केला की,
“स्वतःचा पराभव जवळ आल्याचे दिसताच काँग्रेसवाले विवेक गमावून पिसाळले आहेत. म्हणूनच खोटं, चुकीचं, आणि लोकांना भ्रमित करणाऱ्या गोष्टी पसरवत आहेत. जनता सर्व जाणते; सत्य कायम भाजपाच्या बाजूने उभं राहील.”












